जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही; ठाकरे गट शहर प्रमुख साईप्रसाद काणेकर यांचा इशारा…
बांदा/प्रतिनिधी
दोडामार्ग ते बांदा गॅस पाईपलाईनचे काम बांदा गाडगेवाडी येथे मनसे व शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी बंद पाडले. सार्वजनिक बांधकाम खात्याची कोणतीही परवानगी ण घेता काम सुरु असल्याचा आरोप करत जोपर्यंत संबंधित अधिकारी याठिकाणी येत नाहीत तोपर्यंत काम सुरु करू न देण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी दिला आहे.
आठ दिवसांपूर्वी बेकायदा काम सुरु असल्याच्या तक्रारी आल्याने भाजपच्या सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांच्या नेतृत्वाखाली काम बंद करण्यात आले होते. त्यावेळी दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांचा परवानगीने व स्थानिक प्रशासनाला लेखी कल्पना देऊन काम सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित विभागाची कोणतीही परवानगी न घेता काम सुरु केल्याची माहिती मिळताच मनसेचे माजी बांदा विभागप्रमुख मिलिंद सावंत यांनी काम रोखत ठेकेदाराला जाब विचारला.
त्यानंतर याठिकाणी शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर, शिंदे गटाचे उपतालुकाध्यक्ष भैय्या गोवेकर, राजेश विरनोडकर, चिन्मय नाडकर्णी यांनी येत काम बंद पाडले. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणतीही परवानगी आपल्या कार्यालयाकडून देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे ठेकेदाराला जाब विचारात जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी याठिकाणी येत नाहीत तोपर्यंत काम सुरु करू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला.
