आचरा रोडवरील मच्छी विक्रेत्यांना अखेर हटविले

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री व नगरपंचायतीने केली कारवाई

⚡कणकवली ता.०६-: कलमठ-आचरा रोडवर रस्त्यालगतच लक्ष्मी चित्रमंदिर ते पोलीस स्टेशन पर्यंत मच्छी विक्रेते बसत असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास गेले काही वर्ष सहन करावा लागत होता. या बद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. त्याची दखल घेत कलमठ गावचे सरपंच संदीप मेस्त्री व कणकवली नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली आचरा रोडवर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना हटवून संयुक्त कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये या मच्छी विक्रेत्यांना हटवून कणकवली व कलमठ या दोन्ही ठिकाणच्या असलेल्या मच्छी मार्केटमध्ये बसण्याच्या सूचना देण्यात आल्या. व यापुढे जर मच्छी विक्रेत्यांनी या रस्त्यालगत मच्छी विक्री करिता बसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. कणकवली नगरपंचायत च्या हद्दीत कणकवली नगरपंचायतने या मच्छी विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर हे विक्रेते लक्ष्मी चित्रमंदिर च्या पुढील भागात कलमठ हद्दीत जाऊन बसून मच्छी विक्री करत होते. यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना अनेकदा किरकोळ अपघात देखील घडत होते. यापूर्वी अनेकदा याबाबत सूचना देऊनही कलमठ ग्रामपंचायत कडून त्याची दखल घेतली गेली नव्हती. परंतु आता नवनिर्वाचित सरपंच श्री. मेस्त्री यांच्या ही बाब नागरिकांनी लक्षात आणल्यानंतर तातडीने या सावळ्या गोंधळावर कारवाई करत संदीप मेस्त्री यांनी तात्काळ नागरिकांच्या सूचनेची दखल घेतली. तसेच यापुढे असा अस्ताव्यस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देखील दिला. सर्वसामान्यांमधून या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले .

You cannot copy content of this page