मुख्यालय पत्रकार आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात प्रशासक प्रजित नायर यांचे आश्वासन
ओरोस ता ६
प्रशासक म्हणून आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पत्रकारांना देण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहणार आहे. प्रशासक कालावधीत आणखी सुविधा आवश्यक असल्यास त्या सांगा. त्याचीही पूर्तता केली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी मुख्यालय पत्रकार समिती आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी नायर यांच्याहस्ते जिल्हा परिषद इमारतीतील पत्रकार कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत मुख्यालय पत्रकार समितीच्यावतीने पत्रकार दिन जिल्हा परिषद इमारतीतील पत्रकार कक्षात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशासक नायर, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी राजेंद्र पराडकर, बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता राजेंद्र फिलांगे, शाखा अभियंता गणेश कडुलकर, जिल्हा माहिती सहाय्यक रणजित पवार, कुडाळ नगर परिषद गटनेते विलास कुडाळकर, मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष संजय वालावलकर, सचिव मनोज वारंग, खजिनदार दत्तप्रसाद वालावलकर, परिषद राज्य प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष बाळ खडपकर, सचिव देवयानी वरसकर, सदस्य नंदकुमार आयरे, विनोद दळवी, संदीप गावडे, विनोद परब, गिरीश परब, सतीश हरमलकर, रवी गावडे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी नायर यांच्याहस्ते मराठी पत्रकार सुष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. जिल्हा परिषद इमारत येथे असलेल्या पत्रकार कक्षाचे जिल्हा परिषद स्वनिधीमधून अद्यावतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा शुभारंभ सीईओ नायर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आला. नायर यांनी मुख्यालय पत्रकार यांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण केल्यामुळे त्यांचा समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यापुढे असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली.
