पद्मश्री परशुराम गंगावणे, सुषमा तायशेटे, राजेंद्र पराडकर यांची उपस्थिती
⚡कणकवली ता.०५-:
कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टकडून विविध क्षेत्रातील व्यक्तिंना जाहिर करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण शनिवार, दि. 7 जानेवारीला कणकवली येथे होणार आहे. दू. 3.30 वा. विद्यामंदीर हायस्कूलजवळील महाराजा हॉलमध्ये पुरस्कार वितरण, चित्रकला व निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण होणार आहे.
कलातपस्वी आप्पा काणेकर यांनी आपले समग्र जीवन कलेसाठी समर्पित केले होते. त्यांच्या कलासहयोगाच्या स्मृती सदैव जागत्या ठेवाव्यात या उदात्त हेतूने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ललितलेखक महेश काणेकर यांनी या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. दरम्यान त्यांची सहचारिणी ट्रस्टच्या विश्वस्त उपक्रमशील शिक्षिका उमा काणेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. कै. उमा काणेकर यांच्या शैक्षणिक योगदानाची प्रेरणा नव्या पिढीतील विद्यार्थी शिक्षकांना मिळावी यासाठी गतवर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
पुरस्कार वितरण, निबंध व चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव शिरसाट असणार आहेत. तर कार्यक्रमाचे उद्घाटन भारत सरकारच्या संयुक्त सचिव सुषमा तायशेटे यांच्या हस्ते होणार असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रसिध्द चित्रकार संजय शेलार, संपादक प्रकाशक प्रकाश केसरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
यावेळी कलातपस्वी आप्पा काणेकर स्मृती पुरस्कार, कै. सौ. उमा काणेकर स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण, जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महेश काणेकर, कार्याध्यक्ष प्रशांत काणेकर यांनी केले आहे.
