१५०० स्पर्धक होणार सहभागी;महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना आणि मालवण नगर परिषदेचे आयोजन
मालवण (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना व मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणच्या चिवला बीचवर दि. १७ व १८ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातून सुमारे १२०० ते १५०० स्पर्धक सहभागी होणार असून या स्पर्धेस केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीही उपस्थिती लाभणार आहे, ही स्पर्धा मालवणच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीनेही महत्वाची ठरणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक परब व मालवण नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण नगरपालिकेत पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक परब, प्रशासक संतोष जिरगे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, निल लब्दे, माजी नगरसेवक दीपक पाटकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी दीपक परब म्हणाले, सिंधुदुर्ग मध्ये दोन वर्षांचा कोरोना महामारीचा काळ वगळता गेली अकरा वर्षे मालवणच्या चिवला बीचवर राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा होत आहे. यावर्षी बारावी जलतरण स्पर्ध होत असून मालवण नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने आणि मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. राज्यभरातील स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. स्पर्धकां सोबतच त्यांचे पालकही येणार असल्याने या स्पर्धेला सुमारे पाच ते सहा हजारता लोकांची उपस्थिती लाभण्याची शक्यता आहे. या स्पर्धेमुळे मालवणचे नाव राज्यभर होत असून यामुळे पर्यटन वाढीसही चालना मिळणार आहे, या स्पर्धेत दिव्यांग लोक देखील यामध्ये सहभागी होणार असल्याने स्पर्धेचे हे वैशिष्ट्य आहे ही अशा पद्धतीची स्पर्धा फक्त मालवण चिवला बीच येथे होते. दोन वर्ष कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही परंतु यावर्षी आणखी जोशात ही स्पर्धा होईल. या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक निर्माण होतात त्यांना सर्टिफिकेट मिळते आणि ते त्यांच्या भवितव्यासाठी नोकरीसाठी उपयुक्त ठरते.मालवण सिंधुदुर्ग हे पर्यटनस्थळ असल्याने मालवणातील व्यावसायिकांनाही याचा उपयोग व्हावा यासाठी ही स्पर्धा मालवण मध्येच घेतली जात आहे. यापूर्वी देखील मालवण नगरपालिकेचे आम्हाला सहकार्य असायचे परंतु यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या लिडरशिपमध्ये ही स्पर्धा होत आहे असे यावेळी दिपक परब यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे म्हणाले गेली दोन वर्ष कोरोनाचा काळ वगळता सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेने मालवणात राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा सलग आयोजित केली आहे आणि हे या स्पर्धेचे बारावे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील दोन हजार स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी येणारे स्पर्धक व त्यांच्यासोबत त्यांचे प्रशिक्षक, पालक असे एकूण सात ते आठ हजार लोक या स्पर्धेच्यानिमित्ताने तीन दिवस मालवण मध्ये येणार असल्याने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्याचा मालवणला फायद्याचे आहे असे सांगून ते म्हणाले येणारे स्पर्धक हे आपले पाहुणे आहेत, जसे ऑलिम्पिक मध्ये वेगवेगळ्या देशातून स्पर्धक येतात त्यावेळी ज्याप्रमाणे तेथे माहोल तयार होतो त्याचप्रमाणे मालवण मध्ये देखील वेगवेगळ्या जिल्ह्यातील स्पर्धक येणार आहेत. या तीन दिवसामध्ये मालवणवासीय, हॉटेल व्यावसायिक, व्यापारी, रिक्षा चालक यांनी येणाऱ्या पाहुण्यांची चांगली व सौजन्याची वागणूक द्यावी अशी जलतरण संघटना व मालवण नगरपालिकेच्यावतीने विनंती करत असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, या स्पर्धेमध्ये दिव्यांगा बरोबरच ज्येष्ठ नागरिक हे देखील स्पर्धक असणार आहेत हे या स्पर्धेचे आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे. ओपन सी मध्ये पोहणे हा एक रोमांचक अनुभव आहे. ज्याप्रमाणे स्पर्धकांना रोमांचक अनुभव पहावयास मिळणार आहेत त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी देखील ही पर्वणी आहे त्यामुळे मालवण वासीयांनी व सिंधुदुर्ग वासीयांनी याचा लाभ घ्यावा असे यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सांगितले.
यावेळी स्पर्धेची माहिती देताना निल लब्दे म्हणाले, १६ डिसेंबर रोजी मामा वरेरकर नाट्यगृह येथे सायंकाळी ४ वा. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार आहे. यावर्षी ही स्पर्धा प्रथमच दोन दिवसात विभागण्यात आली असून दि. १७ डिसेंबर रोजी ५०० मीटर, १ कि.मी. आणि २ कि.मी. अंतराची स्पर्धा होणार आहे. तर दि. १८ रोजी ३ कि.मी. व ५ कि.मी. अंतराच्या स्पर्धा होणार आहे. व त्यानंतर दिव्यांग व्यक्तींची स्पर्धा होणार आहे, अशी माहिती लब्दे यांनी दिली. तर बाबा परब यांनी स्पर्धेदरम्यान रुग्णवाहिका तैनात ठेवून त्यासाठी चिवला बीच येथील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याजवळून जाणार मार्ग खुला ठेवण्यात येणार आहे, असे सांगितले.
या जलतरण स्पर्धेत मालवण मधील स्थानिक स्पर्धकांची सहभाग वाढला पाहिजे. स्थानिक स्पर्धकांनी सहभाग घेत आपला फायदा करून घेतला पाहिजे. स्थानिक स्पर्धकांना प्रवेश फी अल्प दराने ठेवण्यात आली आहे, असे यावेळी डॉ. परब यांनी सांगितले. या स्पर्धेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थिती दर्शविणार आहेत, असेही दीपक परब यांनी सांगितले.
