मालवण तालुक्यात सुद्धा ग्राम पंचायत सदस्य पदाचे तीन अर्ज बाद

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १८२ व सदस्य पदासाठी ८४८ असे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आज या अर्जांची छाननी करण्यात आली. रात्री उशिरा पर्यंत झालेल्या या छाननी मध्ये श्रावण, सुकळवाड व वायरी भूतनाथ या ग्रामपंचायती मधील सदस्य पदाचा प्रत्येकी एक अर्ज असे एकूण तीन अर्ज बाद ठरविण्यात आले, अशी माहिती प्रभारी तहसीलदार आनंद मालवणकर यांनी दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच व सदस्य पदासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज मालवण शासकीय तंत्रनिकेतन, पंचायत समिती, तालुका स्कुल, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आणि तालुका समूह केंद्र अशा पाच ठिकाणी पार पडली. पोलीस बंदोबस्तात ही प्रक्रिया झाली. या छाननी मध्ये श्रावण येथील एक सदस्य पदाचा अर्ज, सुकळवाड येथील एक सदस्य पदाचा अर्ज बाद करण्यात आला. तर वायरी भूतनाथ येथील एका उमेदवाराने सदस्य पदासाठी दाखल केलेल्या दोन अर्जापैकी एक अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे छाननी मध्ये सदस्य पदाचे तीन अर्ज बाद ठरविण्यात आल्याने आता सदस्य पदाचे ८४५ व सरपंच पदाचे १८२ अर्ज कायम राहिले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत दि. ७ डिसेंबर रोजी असून त्यानंतर उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

You cannot copy content of this page