बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख पदी राजा गांवकर

महेश राणे, विश्वास गावकर पाठोपाठ तिसरे तालुका प्रमुख नियुक्त

⚡मालवण ता.०५-: ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यात राजकीय पटलावर उलथापालथीच्या घटना घडत असतानाच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या मालवण तालुका प्रमुखपदी राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजा गावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी मालवण तालुक्यात या पक्षाचे तालुकाप्रमुख म्हणून महेश राणे आणि विश्वास गावकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. आता गावकर यांच्या रूपाने तालुकाप्रमुख पदाची आणखी एकाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्यामुळे तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.

राज्यात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची स्थापना झाल्यानंतर सिंधुदुर्गात शिवसेनेला सुरुंग लावण्यास बाळासाहेबांच्या शिवसेनेने सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गातील ग्रामीण भागात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडे प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची संघटनात्मक पातळीवर पदाधिकारी नेमणुकीचे सत्र सुरू झाले आहे त्यातच ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने संघटना बांधणीसाठी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

गेल्याच महिन्यात मालवण तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या मालवण तालुकाप्रमुख पदी महेश राणे आणि विश्वास गावकर या दोघांची निवड करण्यात आली होती. त्यातील महेश राणे यांच्याकडे आचरा, आडवली, मालडी, मसुरे, सुकळवाड या जिल्हापरिषद मतदार संघाचे तर विश्वास गावकर यांच्याकडे मालवण शहर, देवबाग, कट्टा, पेंडूर या विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. आता राजा गावकर यांची तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आल्याने बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हे तीन झाले आहेत राजा गावकर यांची तालुका प्रमुखपदाची घोषणा थेट शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामुळे अखेर मालवण तालुक्यात आता तीन तालुकाप्रमुख नियुक्त झाले आहेत. राजा गावकर यांच्याकडे लवकरच दोन किंवा तीन विभागांची जबाबदारी सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.

You cannot copy content of this page