सचिन कोरलेकर यांनी आरोग्यविषयक दिली माहिती
देवगड,
इंडस हेल्प पुणे या संस्थेतर्फे रविवार दि.४ डिसेंबर रोजी बुद्ध विहार जामसंडे येथे संस्थेचे मार्गदर्शक सचिन कोरलेकर यांनी उपस्थित महिला व पुरुष वर्गाला आरोग्य विषयक सखोल मार्गदर्शन केले. सचिन कोरलेकर हे युनिक अकॅडमी कणकवली येथे स्पर्धा परीक्षेक म्हणूनही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आजपर्यंत त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमधून घडविले आहेत. इंडस हेल्प या संस्थेत गेली दोन वर्ष सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. या संस्थेतर्फे आठ लाख लोकांनी आरोग्यविषयक लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कोरलेकर यांनी उपस्थिताना अनुवंशिकता, डी एन ए व आरोग्य विषयी आजारी पडण्यापूर्वी घ्यावयाची काळजी याविषयी उदाहरणांसह उद्बोधक असे मार्गदर्शन केले. यावेळी सम्यक प्रबोधिनी माजी अध्यक्ष सोनाली जाधव यांनी या संस्थेमार्फत घेतलेल्या उपचारांबाबत माहिती दिली. यावेळी मार्गदर्शक सचिन कोरलेकर यांचे नगरसेविका मनिषा जामसंडेकर, सम्यक प्रबोधिनीच्या गाव शाखेच्या अध्यक्ष पूजा जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाला सम्यकचे माजी अध्यक्ष एम. के. जामसंडेकर, अशोक जाधव, पत्रकार प्रकाश जाधव, सचिव पंकज जाधव, संदीप जाधव आदी मान्यवरांसह महिला व पुरुष वर्ग उपस्थित होता.
