⚡कणकवली ता.०४-: कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील तांब्याचीवाडी येथील श्री. सिद्ध सातेरी देवीची जत्रा बुधवार 7 डिसेंबर रोजी होत आहे. ही जत्रा माहेरवाशिणींची जत्रा म्हणून ओळखली जाते. तांब्याचीवाडी या गावची जत्रा म्हणजे हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील असून या गावचा संपर्क मात्र कोकणशी जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे या गावातील रितीपरंपरा या कोकणातील गावांप्रमाणे असतात. गावात दसरा, गणपती, होळी, जत्रा व गुढीपाडवा हे सन मोठ्या उत्साहाने साजरे करतात.
गाव तसा लहान आहे. पण गावच्या एका बाजुला मौनी जलाशय, एका बाजुला सह्याद्रीच्या उंच रांगामध्ये असलेला प्रसिद्ध सिद्धाचा डोंगर बाजुला प्रसिद्ध कोकणचा व घाटमाथ्याला लागुनच त्याला रांगणा किल्ला, वेदगंगा नदीच्या पवित्र असा उगमस्थानी तांब्याचीवाडी गाव आहे. या गावची वेगळीच शोभा वाढविण्यात गावात सातेरी देवीचे मंदिर, लिंगेश्वर मंदिर, बाराचा चव्हाटा, श्री क्षेत्रफळ व दांडेकर या देवांची मंदिरे आहेत. यात्रेसाठी भाविकांच्या सकळापासूनच रांगा लागलेल्या असतात. भाविकांची येण्या जाण्याची सोय कोल्हापूर, गारगोटी एस.टी. आगारातून केलेली असते. तसेच खाजगी वाहनेही मोठ्या प्रमाणात असतात. कोकणातील भाविक हे मोठ्या प्रमाणे गाटातील पायवाटेने येत असतात. यात कणकवली व कुडाळ तालुक्यातील भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कोकणातील दुकानदारही या यात्रेसाठी मोठ्या संख्येने आपली लहान मोठी दुकाने घेऊन येतात. यात खाजा व महिलांसाठी शेवत्याची पाती व फुले मोठ्या प्रमाणात येत असतात. नवसाला पावणारी म्हणून देवीची ओेळख आजपर्यंत आहे.
रात्री देवीची पालखी वाजत-गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल ताशांच्या गजरात काढली जाते. व त्यानंतर देवीची ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे असे कार्यक्रम होतात. रात्रौ कोकणातील दशावतारी नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सादर होणार आहे. देवळातील कारभार गावकरी व देवस्थान कमिटी पाहते. या जत्रोत्सवाला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेे आहे.
तांब्याचीवाडी येथील श्री सिद्ध सातेरी देवीची जत्रा 7 डिसेंबर रोजी
