⚡मालवण ता.२२-: मालवण तालुक्यातील मालडी गावचे ग्रामदैवत श्री भावई देवी मंदिरात २० व २१ नोव्हेंबर या दोन दिवशी हरीनाम सप्ताह बहुसंख्य भाविकांच्या आणि माहेरवाशीणींच्या उपस्थितीत उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या सप्ताहानिमित्त भावई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती. या हरिनाम सप्ताहाची सुरुवात २० नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता होऊन यावेळी देवीची पूजा अभिषेक करून देवीला मुकुट, साडी व दागिने घालून सजविण्यात आले. त्यानंतर मंत्रघोषात हरीनाम सप्ताह सुरू झाल्यावर देवीची आरती होऊन सात प्रहराचा हरीनाम सप्ताह सुरू झाला. यावेळी देवीची खणानारळानी ओटी भरण्यासाठी सुहासिनीनी गर्दी केली. तर अनेकांनी नवस फेडले. तर मध्यरात्री दिंडी काढण्यात आली.
तसेच २१ रोजी सकाळी काकड आरती झाली. त्यानंतर १० वाजता उत्तर पूजा होऊन सप्ताह समाप्ती झाली. त्यानंतर देवालया भोवती पाच प्रदक्षिणा घालून महाआरती करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सप्ताहात १५ भजन मंडळांनी विविध भजने, अभंग व नृत्याविष्कार सादर करत ईश्वरी सेवा बजावली. सप्ताह यशस्वी होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व मुंबई स्थित ग्रामस्थांनी मेहनत घेतली.
