महिलांनी अर्थसत्ता, धर्मसत्ता, राज्यसत्ता हातात घेतली पाहिजे

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे आवाहन

⚡मालवण ता.२२-:
जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी असे म्हटले जात असले तरी महिलांनी केवळ पाळण्याची दोरी सांभाळू नये. फक्त मुलं जन्माला घालणे एवढंच महिलेचे काम नसून पाळण्याच्या दोरीबरोबरच अर्थसत्ता, धर्मसत्ता, राज्य सत्ता अशा सत्तेच्या सर्व दोऱ्या आपल्या हाती ठेवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मालवण येथे बोलताना केले.

जिल्हा दौऱ्यावर असलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मालवणात शिवसेना शाखेत भेट दिली. यावेळी अंधारे यांचे मालवणातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी औक्षण करत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपनेत्या संजना घाडी, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, तालुका संघटक सौ. पूनम चव्हाण, सौ. दीपा शिंदे, सौ. श्वेता सावंत, माजी नगरसेविका सौ. सेजल परब, सौ. दर्शना कासवकर, सौ. तृप्ती मयेकर, सौ. शिल्पा खोत, नीना मुंबरकर, नंदा सारंग, सौ. विद्या फर्नांडिस, युवतीसेना अधिकारी सौ. निनाक्षी शिंदे- मेथर, रश्मी परुळेकर, पूजा तळाशीलकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, उमेश मांजरेकर, पंकज सादये, भाई कासवकर, मनोज मोंडकर आदी व इतर शिवसैनिक व महिला कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, महिलांनी आता प्रत्येक सत्तेची दोरी हाती ठेवली पाहिजे. शिवसेना महिला आघाडीत काम करणाऱ्या महिलांनी आपण कुठे कमी पडतोय हे शोधा, आणि त्यादृष्टीने काम करा. लोकांच्या छोट्या- मोठ्या प्रसंगात भेटून त्यांना साथ द्या, अडचणीच्या काळात लोकांना मदत करा, लोकांना आपली भूमिका पटवून देताना गोड भाषा वापरून लोकांशी संपर्क वाढवा, महिलांनी एकत्र येऊन काम करताना शिवसेना महिला आघाडी सक्षम करावी, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना उपनेत्या संजना घाडी म्हणाल्या, शिवसेनेच्या महिला आघाडीतील महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकजूट ठेवली पाहिजे, बाळासाहेबांचे विचार सर्वत्र पोहचविले पाहिजे. शिवसेनेची महिला आघाडी ही मधमाशांसारखी असून ती एकत्र काम करून मध निर्माण करते तर कोणी दगड मारला तर अंगावरही जाते. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने मतांच्या रूपाने विश्वास संपादन करा, आपल्या कामाच्या माध्यमातून शिवसेना मजबूत करा, असेही सौ.घाडी म्हणाल्या.

You cannot copy content of this page