सत्यशोधक संघटनेचे शिक्षक, कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

कल्पना मलये यांना शिक्षिका पुरस्कार तर सरफराज अहमद यांना कार्यकर्ता पुरस्कार

⚡कणकवली ता.२१-: महात्मा फुले स्मृतीदिन हाच खरा शिक्षक दिन मानण्यात यावा, ही मागणी घेऊन सत्यशोधक विद्यार्थी संघटना अनेक वर्षे प्रबोधन करीत आहे. त्याचाच भाग म्हणून सिंधुदुर्गात दर २८ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील कार्यकर्ता व शिक्षक – शिक्षिकेला सत्यशोधक पुरस्कार प्रदान केला जातो. त्यानुसार यावर्षी महाराष्ट्रातील आघाडीचे संशोधक कार्यकर्ते सरफराज अहमद यांना सत्यशोधक कार्यकर्ता पुरस्कार तर कणकवलीतील प्राथमिक शिक्षिका तथा प्रतिथयश साहित्यिक कल्पना मलये यांना सत्यशोधक शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सरफराज अहमद हे महाराष्ट्रातील मध्ययुगीन इतिहासकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. मध्ययुगीन इतिहासाचे वस्तुनिष्ठ लेखन व्हावे व इतिहास अभ्यासाला चालना मिळावी, यासाठी त्यांनी सोलापूर येथे रिसर्च सेंटरची स्थापना केली आहे. कल्पना मलये यांनी अध्यापनात वौविध्यपूर्ण प्रयोग करतानाच बालविश्व धुंडाळणारे लेखनही सातत्यपूर्ण केले आहे. त्यांची बहुचर्चित ‘कारटो’ ही मालवणी भाषेतील पहिली बालकादंबरी मागील वर्षी प्रकाशित झाली. त्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा तसेच संवादाचे कार्यक्रम घेत असतात.

पुरस्कार वितरण महात्मा फुले स्मृतीदिनी, सोमवार २८ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वा. कुडाळ येथील ओंकार डिलक्स सभागृहात होणार आहे. समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सोहळ्यात गोव्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच गोव्यातील मायनिंगविरुद्ध लढाईचे यशस्वी नेतृत्व करणारे रमेश गवस उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी उपस्थित रहावे , असे आवाहन समता प्रतिष्ठानचे सचिव अंकुश कदम, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष राहुल कदम व सचिव निलिमा जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

You cannot copy content of this page