भाजप युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांची मागणी
मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून यानंतर आगामी काळात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपच्या वतीने युवकांनाही प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी मंगळवारी घेण्यात आलेल्या भाजयुमोच्या बैठकीत केली. यावर सकारात्मक विचार करून वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी दिली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक मंगळवारी जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील तालुका कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवकांना देखील संधी देण्याची महत्वाची मागणी सौरभ ताम्हणकर यांनी केली. यावेळी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, शहराध्यक्ष ललित चव्हाण, मंदार लुडबे, सुशांत घाडीगांवकर, तुषार साळगावकर, नारायण लुडबे, जगदीश चव्हाण, निशय पाळेकर, राकेश सावंत, निनाद बादेकर, कुणाल खानोलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
