मडुरा पंचक्रोशीतील मतदारांमधून नाराजीचा सूर
⚡बांदा ता.१९-: मडुरा पंचक्रोशीतील विविध समस्यांकडे आजपर्यंत लोकप्रतिनिधी व नेते मंडळींनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे मडुऱ्यातील काही मतदारांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. मतदारांचा हा निर्णय म्हणजे लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याचा नाराजीचा सूर मतदारांमधून व्यक्त होत आहे.
बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा व शेर्ले गावात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य नव्हे तर रस्ताच गायब होण्याच्या मार्गावर आहे. मोठमोठाल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव जाईल अशी परिस्थिती सद्यस्थितीत आहे. त्यामुळे निदान धोकादायक खड्डे तरी उमेदवारांना दिसणार का किंवा आपल्या नेत्यांना याकडे लक्ष देण्यासाठी सांगणार का, असा सवाल मतदारांमधून विचारला जात आहे.
निवडणूका आल्यानंतर मडुरा रेल्वे स्थानकावर ए्नसप्रेस गाड्या थांबविण्यासारखी शेकडो आश्वासने देण्यात येतात मात्र त्यानंतर सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. महत्वाचे म्हणजे ग्रामपंचायत निवडणुका लागल्या की तालुकास्तरीय नेते मंडळी ते आमदार, खासदार यांचेही याकडे लक्ष लागलेले असते. परंतु समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या विकासात्मक उदासिनतेमुळे आम्ही ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार घालणार असल्याचे अनेक मतदारांनी बोलून दाखविले.
