नट वाचनालयात बालदिन उत्साहात साजरा

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहराच्या सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या येथील नट वाचनालयात बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा साकारली होती.
वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वाचनालयचे कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोसकर, निलेश मोरजकर, अंकुश माजगावकर, अनंत भाटे, शुभम नाईक, ग्रंथपाल प्रमिला नाईक, सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते.
यावेळी अनंत भाटे यांनी पंडित नेहरू यांच्या जीवनकार्यांची माहिती दिली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जागतिक पातळीवर भारताला विविध क्षेत्रात त्यांनी नाव कमावून दिले. त्यांना मुलांविषयी विशेष प्रेम होते. त्यामुळे नेहरू यांचा आदर्श आताच्या युवा पिढीने घेत आपल्या जीवनात मार्गक्रमण करावे असे आवाहन त्यांनी केले. आभार राकेश केसरकर यांनी मानले.

You cannot copy content of this page