सभेत गीत, कविता, ललित सादरीकरण व पुस्तक प्रकाशन
⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ-:* आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याची पंचविसावी सभा रविवार २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आजगाव वाचनालयात आयोजित करण्यात आली आहे. यात सदस्यांच्या वतीने गीत, कविता, ललित असे सादरीकरण तसेच एका पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे.
मुलांना साहित्याची गोडी लागावी म्हणून गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील एकेका मुलालाही सादरीकरणाची संधी दिली जाणार आहे. साहित्याविषयी प्रेम निर्माण व्हावे, नवोदिताना व्यासपीठ व मार्गदर्शन मिळावे या हेतूने २०१८ साली ‘साहित्य प्रेरणा कट्ट्याचा’ आजगाव येथे जन्म झाला. पंचक्रोशीतील साहित्यप्रेमी यात सहभागी होत असतात. पहिल्या सभेला २२ सदस्य उपस्थित होते. तसेच दर कार्यक्रमात साधारणपणे १५ ते २० सदस्य उपस्थित असतातच. सलग १७ मासिक कार्यक्रम झाल्यानंतर कोरोनाचे संकट आले आणि फेब्रुवारी २०२० नंतर थांबावे लागले. निर्बंध मुक्त झाल्यावर पुन्हा २ एप्रिल २०२२ रोजी कट्टा सुरू केला. त्यानंतर सलग सात कार्यक्रम झाले. आता २० नोव्हेंबर २०२२ रोजी कट्ट्याचा पंचविसावा कार्यक्रम आयोजित केला आहे. आतापर्यंत श्री.राजन खान, डाॅ. सुधाकर ठाकूर- कुडाळ, डाॅ. मधुकर घारपुरे- सावंतवाडी, सौ.वृंदाताई कांबळी-वेंगुर्ला, वैशाली पंडित-मालवण, माधुरी आठल्ये-ऐरोली, देवदत्त परुळेकर- वेंगुर्ला, रामचंद्र धाकोरकर- सावंतवाडी, गजानन मांद्रेकर व सुभाष शेटगावकर-गोवा यांनी कट्ट्यावर हजेरी लावली आहे. यापैकी डाॅक्टर ठाकूर व डाॅक्टर घारपुरे हे कट्ट्याचे सदस्यच बनले आहेत. यावेळी कट्ट्यावर एका पुस्तकाचे प्रकाशन झाले असून, अजून एका पुस्तकाचे प्रकाशन या पंचविसाव्या कार्यक्रमात होणार आहे. कट्ट्याचा एक कार्यक्रम साहित्य संगम,गोवासह संयुक्तपणेही केला गेला आहे. या कार्यक्रमाला सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित राहून या साहित्य चळवळीला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.
