काँग्रेसच्या बाळू अंधारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केले मत
मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत खरेदी विक्री संघातील कामगारांच्या पॅनेलशी केलेल्या समझोत्यामुळे भाजप पुरस्कृत पॅनेलला विजय शक्य झाला असला तरी या निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली लढत दिली. भविष्यात महाविकास आघाडी पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीत उतरेल असे मत महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर,नारायण सहकार पॅनल मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस मालवणचे ज्येष्ठ नेते महेश उर्फ बाळू अंधारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत रामेश्वर नारायण सहकार पॅनलचा पराभव झाल्यानंतर या पॅनलचे महेश अंधारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने चांगली लढत दिली. या निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी आकडेवारी पाहता ५०० मतांच्या घरात मते मिळविण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत मालवण शहरातून महाविकास आघाडीला जास्त मतदान झाल्याने आगामी काळात त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असे पत्रकात नमूद करून श्री अंधारी यांनी या निवडणुकीत कामगारांच्या पॅनलशी केलेल्या समझोत्यामुळेच भाजपला विजय शक्य झाला. कामगारांनी उभ्या केलेल्या उमेदवाराला मिळालेल्या मतामुळेच विरोधकांना विजय मिळविणे शक्य झाले हे सत्य नाकारून चालता नये. तरीही या निवडणुकीसाठी कष्ट करणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे व मतदारांचे आभारी आहोत, असेही महेश अंधारी यांनी म्हटले आहे.
