आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत हा जोर कायम ठेवावा; भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलने मिळविलेल्या विजयाने आपण भावुक झालो आहोत. हा विजय मला माझाच असल्याचे वाटत आहे, भाजप कार्यकर्त्यांनी आपली एकजूट अशीच कायम ठेवल्यास भाजपला हरविण्याचा कोणाच्या बापात दम राहणार नाही. आगामी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा हा विजयाचा जोर भाजप कार्यकर्त्यांनी असाच कायम ठेवावी असे प्रतिपादन भाजपचे नेते निलेश राणे यांनी मालवण भाजप कार्यालय येथे बोलताना व्यक्त केली.
मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या पंच वार्षिक निवडणुकीत निर्विवाद यश संपादन केल्यानंतर भाजप प्रणित श्री देव रामेश्वर नारायण सातेरी सहकार विकास पॅनेलने एकच जल्लोष केला. भाजपने तर मालवण शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला तर डीजेच्या तालावर भाजप कार्यकर्त्यांनी फेर धरत नृत्य सादर केले. जल्लोशी वातावरणात नवनिर्वाचित भाजपच्या संचालकांची मालवण शहरात निवडणूक काढण्यात आली. या मिरवणुकीनंतर मालवण भाजप कार्यालयात आयोजित नूतन संचालकांच्या सत्कार समारंभात माजी खासदार निलेश राणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, आबा हडकर, सुहास हडकर, महेश मांजरेकर, दिपक पाटकर, विजय केनवडेकर, सौ. सरोज परब, सौ. ममता वराडकर, सौ. पूजा सरकारे, सौ. अमृता सावंत, आनंद शिरवलकर, राजू परुळेकर, सौरभ ताम्हणकर, ललित चव्हाण तसेच भाजप प्रणित पॅनेलचे सर्व नूतन संचालक उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे म्हणाले आजचा हा विजयाचा जोर भाजप कार्यकर्त्यांनी असाच कायम ठेवावा. आजचा हा विजय स्व. सुनील मलये यांना खरी श्रद्धांजली ठरली आहे, असेही यावेळी निलेश राणे म्हणाले.
