⚡मालवण ता.१२-: मालवण शासकीय तंत्रनिकेतन मधील सात सुरक्षारक्षकांचा गेल्या चार महिन्यांचा पगार थकीत असताना याबाबत मनसेचे अमित इब्रामपुरकर यांनी तंत्रशिक्षण मंडळाचे सहसंचालक डॉ. कांबळे यांचे लक्ष वेधत पगार जमा न झाल्यास मनसे स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा दिला होता. मनसेच्या या दणक्यानंतर चार पैकी तीन महिन्यांचा रु. ५ लाख एवढा एकत्रित सुरक्षा रक्षकांच्या खात्यावर जमा झाला आहे. याबाबत सुरक्षा रक्षकांनी अमित इब्रामपुरकर व मनसेचे आभार मानले आहेत.
माहे जून,जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर या चार महिन्यांचे वेतन मिळण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन कुंभारमाठ येथील सात सुरक्षारक्षकांनी दिवाळीपूर्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिले होते. सुरक्षारक्षक महेश सुर्वे,संजय गावडे,दिगंबर यादव,संजय देऊलकर,शिवदास परब,विनायक राणे ,शरद पडवळ यांचा प्रलंबित पगार मिळावा म्हणुन जुलै पासून तीन वेळा तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनी तंत्रशिक्षण मंडळाला आर्थिक वर्ष २०२२-२०२३ साठी अनुदान प्राप्त होण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. तरीसुद्धा सुरक्षारक्षकांना पगार मिळाला नव्हता. अखेर सुरक्षारक्षकांनी मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचे याप्रकरणी लक्ष वेधले होते.
अमित इब्रामपूरकर यांनी प्राचार्य पाटील यांच्याशी संपर्क करत सर्व माहिती जाणून घेत तंत्रशिक्षण मंडळाचे सहसंचालक डॉ.कांबळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत शासनाच्या अनुदानाअभावी सुरक्षारक्षकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे सांगितले. अनुदान त्वरित वितरित करणे आपले काम असुन येत्या आठ दिवसात शासकीय तंत्रनिकेतन खात्यात जमा करा अन्यथा मनसे स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा अमित इब्रामपुरकर यांनी दिला होता. यावर तंत्रशिक्षण मंडळाकडून अनुदानासंबंधी तातडीने दखल घेवून पहिल्यांदा शासकीय तंत्रनिकेतन खात्यात जमा झाले. त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग सुरक्षा मंडळाच्या खात्यावर जमा होवून सातही सुरक्षा रक्षकांचे एकूण ४ महिन्यांचे एकत्रित सुमारे ६.७० लाख पैकी तीन महिन्याचे ५ लाख अनुदान संबंधित सुरक्षा रक्षकांच्या खात्यावर आज जमा झाले.
शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे कंत्राटी सेवेचे मासिक बिल १.९० लाख रुपये आहे. सदरील अनुदान इतर पॉलिटेक्निक संस्थांच्या अखर्चित रकमेतून वितरित केले गेले आहे. याबाबत सातही सुरक्षा रक्षकानी अमित इब्रामपुरकर तसेच मनसे पक्षाचे आभार मानले आहेत.
