भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांची शिष्टाई;अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन
वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी शहरातील व तालुक्यातील विविध समस्यांकडे लक्षवेधण्यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डी.के.सुतार यांनी सुरु केलेले उपोषण संबंधित विभागाच्या आश्वासनानंतर व भाजपा अध्यक्ष नासिर काझी यांच्या यशस्वी मध्यस्थी नंतर काल सायंकाळी स्थगित करण्यात आले.
वैभववाडी जुने एस.टी.बस स्थानकासमोर मंगळवारी सकाळी ११ वा.पासून सुतार यांनी उपोषण सुरु केले. दिवसभरामध्ये तालुक्यातील विविध पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते व नागरीकांनी उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्या उपोषणास पाठींबा दिला.
काल संध्याकाळी नायब तहसिलदार श्रीमती कासकर, अनंत कवळेकर, पोलिस निरीक्षक अमित यादव, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुतार, नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज कांबळे, कर्मचारी, यांनी उपोषणस्थळी भेट देऊन श्री. सुतार यांच्याशी चर्चा केली.
जुना एस.टी.बस स्थानक तोडण्यची मागणी सुतार यांनी केली होती. एस.टी.प्रशासनाने याची दखल घेत जुने बस स्थानक तोडण्यास सुरुवात केली आहे. तर वैभववाडी शहरातील गटारांचा प्रश्न व सांडपाणी प्रश्नांवर सुतार यांनी नगरपंचायत प्रशासनावर ताशेरे ओढले. भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी यांनी सुतार यांना सांगितले की, नगरोत्थानमधून शहरातील गटार लाईन व फुट पाथसाठी ५० लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच निविदा प्रक्रीय पूर्ण होईल. शहराच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शहरातील हा प्रश्न लवकरच सुटणार आहे. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे. असे आवाहन केले.
तालुक्यातील राज्य मार्गावरील धोकादायक झाडे लवकरच तोडण्यात येतील. असे शाखा अभियंता सुतार यांनी सांगितले. तालुक्यातील जिल्हा परिषद रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी संबंधित ग्रामपंचायतीना तोडण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले माञ संबंधित विभागाचे अधिकारी आले नसल्याबाबत डि.के. सुतार यांनी नाराजी व्यक्त केली.
महिनाभर अगोदर उपोषणाची नोटीस ते देऊन संबंधित अधिकारी याची दखल घेत नसतील तर तालुक्यातील समस्या कशा सुटणार असा प्रश्न करीत. आपण जनतेचे सेवक आहात याची सगळ्यांनी जाणीव ठेवावी असे सूनावले.
यावेळी काॕग्रेस महिला तालुकाध्यक्ष मीनाताई बोडके, नगरसेविका अक्षता जैतापकर, भाजपचे बंड्या मांजरेकर, मनसे तालुकाध्यक्ष सचिन तावडे, दिपक पार्टे, अॕड,प्रताप सुतार, यांच्यासह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
