ओरोस ता.०१-:
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून “कायदेविषयक जागरुकता” आणि “हक हमारा तो भी है @ ७५ अभियान अंतर्गत न्यायाधीन बंदी यांना त्यांचे हक्क व अधिकार बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी माहीती दिली जात आहे. याबाबतचे मार्गदर्शन शिबिर सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कारागृहात संपन्न झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून दिनांक ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ठरवुन दिलेल्या कृती आराखड्यानुसार “कायदेविषयक जागरुकता” आणि “हक हमारा तो भी है @ ७५” हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा कारागृह सिंधुदुर्ग ओरोस वर्ग-१ व जिल्हा कारागृह सावंतवाडी वर्ग-३ या ठिकाणी “हक हमारा तो भी है @ ७५” कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या अभियानामधुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डी. बी. म्हालटकर हे मार्गदर्शन करत असुन त्या माध्यमातून न्यायाधीन बंदी यांना त्यांचे हक्क व अधिकार बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी माहीती दिली जात आहे. तसेच कैद्यांना मदत केली जाणार आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कारागृहात ३१ ऑक्टोबर रोजी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. यावेळी सचिव तथा न्यायाधीश डी बी म्हालटकर यांनी मार्गदर्शन केले.
