स्वातंत्र्य दिनी आणखी १६७ महसूल गाव होणार हागणदारी मुक्त

करण्यात येणार घोषणा

सिंधुदुर्गनगरी ता ८
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यातील अंदाजित १६७महसुल गाव हागणदारी मुक्त अधिक (ODF+) दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी घोषित करण्यात येणार आहेत. या करीता जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या माध्यमातुन गावभेट कार्यक्रमांचे आयोजन करुन पाहणी करण्यात आली आहे. अशी माहीती श्री. प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली .

आपला जिल्हा हागणदारी मुक्त झालेनंतर जिल्ह्याची वाटचाल हागणदारी मुक्त अधिक (ODF+) कडे सुरु झाली होती. हागणदारी मुक्त गाव संकल्पनेत गावातील ९० टक्के कुंटुबांकडे वैयक्तिक शौचालय असणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे गावातील एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाता नये असा निकष होता. तर हागणदारी मुक्त अधिक (ODF+) गावातील वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर गावातील कुंटुंबाकडुन होत असला पाहिजे तसेच गावातील एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाता कामा नये. गावातील सांडपाण्यासाठी वैयक्तिक किंवा सार्वजनिक ठिकाणी शोषखड्डे निर्मिती तर घनकच-या करीता वैयक्तिक व सार्वजनिक ठिकाणी खतखड्डे उभारणे गरजेचे आहे. गावातील प्लॉस्टिक कच-या करीता प्लॉस्टिक संकलन शेड व गावातील कचरा गोळा करण्याकरीता बॅटरी ऑपरेटेड व मॅन्युअल ट्रायसायकल घेणे गरजेचे आहे. हागणदारी मुक्त अधिक (ODF+) चे निकष पुर्ण करीत असताना गावात स्वच्छतेचे संदेश रंगविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ असणे गरजेचे आहे. हे सर्च निकष पुर्ण करणा-या ११५ गावांना पहिल्या ट्प्यात हागणदारी मुक्त अधिक म्हणुन घोषित करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा २ अंतर्गत जिल्ह्यातील ७४१ महसुल गावापैकी येत्या १5 ऑगस्ट रोजी अंदाजित १६७ महसुल गाव हागणदारी मुक्त अधिक (ODF+) म्हणुन घोषित करण्यात येणार आहेत. यामध्ये देवगड तालुक्यातील ५३, दोडामार्ग तालुक्यातील ५, कणकवली तालुक्यातील ३, कुडाळ तालुक्यातील १२, मालवण तालुक्यातील ४५, सावंतवाडी तालुक्यातील १२, वैभववाडी तालुक्यातील २४ तर वेंगुर्ला तालुक्यातील १३ महसुल गावाचा समावेश आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या माध्यमातुन गावभेट कार्यक्रमांचे आयोजन करुन या गावाना भेटी देण्यात आल्या आहेत. भेटी दरम्यान ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, पाणी पुरवठा व स्वच्छता आरोग्य समिती, ग्रामस्थ, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच गावात सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत केलेल्या कामाची माहिती हि घेण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विनायक ठाकुर, यांनी दिली .

You cannot copy content of this page