तहसीलदार मारुती कांबळे यांचे आवाहन
देवगड
मतदार याद्यातील तपशिलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छीकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. यासाठी मतदार नोंदणी नियम १९६० मधील नियम २६ बी नुसार फॉर्म नं. ६ ब तयार करण्यात आला आहे. या सुधारणांची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. मतदारांनी आपल्या मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा, असे आवाहन देवगड तहसीलदार मारुती कांबळे यांनी केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, विद्यमान मतदारांकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांशी ओळख प्रस्थापित करणे, मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणिकरण करणे, एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरून आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे मतदाराच्यावतीने ऐच्छीक आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमाक भरण्यासाठी अर्ज क्र. ६ ब, ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमावरदेखील उपलब्ध असेल. ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठीची सुविधा पोर्टल अॅपच्या माध्यमातून स्व-प – माणिकरण व स्वप्रमाणिकरणाशिवाय ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरता येतील.
स्व-प्रमाणिकरण भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल/ अॅपच्या माध्यमातून मतदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्र. ६ ब भरून आधार क्रमांक नोंदवू शकतो आणि UIDAI कडे नमूद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त ओटीपीद्वारे आधारचे प्रमाणिकरण करू शकतो. तथापि तपशिलात फरक असल्यास प – माणिकरण अपयशी ठरण्याची शक्यता आहे. स्व-प्रमाणिकरणाशिवाय जर मतदारास स्व-प्रमाणिकरण करावयाचे नसल्यास किंवा वरीलप्रमाणे प्रमाणिकरण अपयशी ठरत असल्यास मतदार त्याचा स्व-प्रमाणिकरणाशिवाय ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्र. ६ ब भरून त्यासोबत योग्य दस्तावेज सादर करू शकतो.
घरोघरी भेट देऊन मतदाराकडून छापील नमुना अर्ज क्र. ६ ब द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आधार क्रमांक मिळविण्याचा उद्देश मतदार यादीतील त्याच्या नोंदीचे प्रमाणिकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे. जर मतदाराकडे आधार क्रमांक नसेल आणि त्यामुळे त्याचा / तिचा आधार क्रमांक सादर करता येत नसेल, तर मतदाराला नमुना अर्ज क्र. ६ मध्ये नमूद केलेल्या अकरा पर्याची कागदपत्रांपैकी (उदा. पॅनकार्ड, फोटोसह पासबुक, पासपोर्ट, मतदारकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायलीग लायसन्स, फोटोसह पेन्शन कागदपत्र केंद्र व राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र इ. ) कोणताही एक दस्तावेज सादर करू शकतील.
देवगड तालुक्यातील सर्व मतदारांनी आपल्या मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक संलग्न करून घेण्याचे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, कणकवली विधानसभा मतदारसंघ तथा देवगड तहसीलदार श्री. कांबळे यांनी केले आहे.
