ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांचा दुजोरा
बांदा/प्रतिनिधी
गेली १५ वर्षे विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा बांदा सटमटवाडी येथील
सीमा तपासणी नाका लवकरच सुरु करण्यात येणार असून त्यांदृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. याला येथे कार्यरत असलेल्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. गेले अनेक वर्षे विविध कारणांनी हा तपासणी नाका वादात सापडला होता.
या नाक्यावर आरटीओ, पोलीस, वनविभाग, उत्पादन शुल्क, महसूल, दहशतवाद विरोधी पथक तसेच अमली पदार्थ विरोधी पथक अशा सात विभागाचे कर्मचारी २४ तास सेवा बाजाविणार आहेत. हा अत्याधुनिक तपासणी नाका असून या नाक्यावरून प्रवास करणारे कोणतेही वाहन हे डिजिटल स्कॅनिंग होऊन बाहेर पडणार आहे. यामुळे दारू वाहतूक, अमली पदार्थ वाहतूक याची तात्काळ माहिती मिळण्यास मदत होणार आहे. नाका सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर सध्या याठिकाणी साफसफाई व रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
