रेडकर हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयाचे आयोजन
मालवण दि प्रतिनिधी
भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत असून दर दहा लाख लोकसंख्ये मागे ब्रेस्ट कॅन्सरचे २५८ रुग्ण आढळतात. सिंधुदुर्गात ही या रोगाची दाहकता अधिक आहे सिंधुदुर्गात हे प्रमाण जवळजवळ पाचशे पेक्षा अधिक असल्याने सिंधुदुर्गाला ही धोक्याची घंटा आहे म्हणूनच सामाजिक बांधिलकी स्वीकारून रेडकर हॉस्पिटल रिसर्च ट्रस्ट कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील दैवज्ञ भवन येथे दि १३ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत यावेळेत मोफत ब्रेस्ट कॅन्सर शिबीर आणि उपचार शिबीर आयोजित केले असून या शिबिरात ब्रेस्ट कॅन्सरवर शस्रक्रिया आणि संशोधन करणारे कराड येथील सुप्रसिद्ध डॉ. सुरेश भोसले हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मालवण येथील डॉ. रेडकर रिसर्च हॉस्पिटलचे डॉ. विवेक रेडकर आणि कणकवलीच्या डॉ. शमिका बिरमोळे यांनी येथे बोलताना सांगितले.
मालवण येथे ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर डॉ. विवेक रेडकर आणि डॉ. शमिका बिरमोळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. रेडकर हॉस्पिटल रिसर्च ट्रस्टचे रविकिरण तोरसकर, डॉ. गार्गी ओरसकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. शमिका बिरमोळे म्हणाल्या, सिंधुदुर्गात मालवण येथे प्रथमच ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले असून यात महिलांसाठी स्व स्तन तपासणी कशी करावी याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात महिलांमध्ये असलेले ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेऊन जनजागृतीच्या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम राबविणार आहोत. यासाठी महिलांबरोबरच पुरुषांनीही पुढाकार घेऊन आपल्या घरातील स्त्रीला या तपासणी व उपचार शिबिरासाठी पाठवावे जेणेकरून स्त्रियांमध्ये एक नंबरचा असणारा ब्रेस्ट कॅन्सर हा एडव्हान्स स्टेजला होणार नाही याची काळजी घेतानाच अशाप्रकारच्या तपासणी आणि उपचार शिबिरातून त्वरित निदान होऊन महिला चांगले आयुष्य जगू शकतील असे सांगून त्या म्हणाल्या स्तन किंवा काखेमध्ये नवीन गाठ जाणवणे स्तनाचा काही भाग जाड होणे किंवा सूज येणे स्तनाच्या त्वचेची जळजळ / पूरळ किंवा सुरकुत्या / खड्डा पडणे. स्तनाग्र भागात किंवा स्तनामध्ये लालसरपणा किवा त्वचा सोलवटणे. स्तनाग्र आत खेचणे किंवा स्तनाग्र भागात वेदना. स्तनाग्र स्त्राव -रक्तस्राव दुधाव्यतिरिक्त इतर कोणताही स्त्राव. स्तनाच्या आकारात किंवा पोत यांत कोणताही बदल. स्तनाच्या कोणत्याही भागात वेदना. कुटुंबामधे अथवा जवळच्या नातेवाईकांमधे स्तनाचा कर्करोग असणे ही लक्षणे असून ही लक्षण आढळणाऱ्या महिलांनी या उपचार शिबिरात सहभागी होणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या
डॉ रेडकर म्हणाले, कॅन्सर अनेक प्रकारचे असतानाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’ जनजागृती मोहीम, या संस्थांनी हाती घेण्याचे तीन महत्वाचे उद्देश आहेत.
सध्या भारतात होणा-या कॅन्सरपैकी हा पहिल्या क्रमांकावरचा कॅन्सर आहे. दुसरा मुद्दा म्हणजे पहिल्या स्टेजमधे आढळलेला ब्रेस्ट कॅन्सर पुर्णपणे बरा होवू शकतो. तर तिसरे म्हणजे रोगाच्या प्राथमिक अवस्थेमधे रुग्णच स्वतःला तपासून त्याचे निदान करू शकतो.त्यासाठी कोणत्याही तंत्रज्ञानाची गरज भासत नसल्याचे सांगून ते म्हणाले, सिंधुदूर्ग जिल्ह्यामधे कॅन्सरवर उपचार करणारे, प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग होवूच नये म्हणून कार्य करणारे, पॅलिएटिव्ह म्हणजे ज्यामधे औषधोपचारांद्वारे रुग्णाचे जीवनमान योग्य राखण्याचा प्रयत्न होतो, अथवा क्युरेटिव्ह म्हणजे ज्यामधे केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो, यापैकी अधिकृत असे एकही केंद्र खाजगी किंवा सरकारी यंत्रणेकडे नाही त्यामुळे पॅलिएटिव्ह व क्युरेटिव्ह उपचार केंद्र कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे हे केंद्र होण्यासाठी आपले प्रयत्न रहाणार असल्याचे डॉ रेडकर म्हणाले
डॉ रेडकर पुढे म्हणाले हा उपक्रम पुढील वर्षभर राबविण्यात येणार असून डॉ. शमिका बिरमोळे या दर बुधवारी सकाळी नऊ वाजता संशयीत रुग्णांची तपासणी ग्रामिण रुग्णालय, मालवण येथे करणार आहेत. तर डॉ. गार्गी ओरसकर या दर मंगळवार ते गुरूवार दुपारी साडेबारा ते दोन या वेळेत रेडकर हॉस्पिटल, मालवण येथे सदर रुग्णांची तपासणी करण्यासाठी उपलब्ध असतील. ब्रेस्ट कॅन्सरचे संशयीत रुग्ण तसेच पुर्वी कॅन्सर झाल्यामुळे उपचार चालू असलेले रुग्ण सेकंड ओपिनियन घेण्यासाठी या शिबिराचा लाभ घेवू शकतात. हे तपासणी शिबीर पुर्णतः मोफत आहे. दारिद्र्य रेषेखालील तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या रुग्णांना सर्व उपचार मोफत देण्यात येतील.
जिल्ह्यातील सामाजिक काम करू इच्छिणा-या तसेच स्वतःचे कॅन्सर परिक्षण करून घेवू इच्छिणा-या महिलांनी आपली नोंदणी रेडकर हॉस्पिटल, मालवण येथे ७५८८५४४७०० या क्रमांकावर करावी किंवा डॉ. गार्गी ओरसकर यांच्याकडे ९०२८५५००२३ या क्रमांकावर करावी असे आवाहन केले आहे
