सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्रेमचंद जयंती, टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

⚡मालवण ता.०२-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या जयंतीसह लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. अन्वेषा कदम यांच्या हस्ते प्रेमचंद, टिळक व साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एच. एम. चौगले, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. एस. सी. बर्वे, प्रा. एम. आर. खोत, प्रा. हसन खान, प्रा. अन्वेषा कदम आदी उपस्थित होते. यावेळी प्रभारी प्राचार्य प्रा. एच. एम. चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये प्रेमचंद यांच्या लिहिलेल्या कथा काचपेटी मध्ये लावण्यात आल्या होत्या. तसेच महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये प्रेमचंद यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

यावेळी प्रभारी प्राचार्य श्री. चौगले यांनी प्रेमचंद यांच्या साहित्याचा आणि जीवन प्रवासाचा आढावा घेत प्रेमचंद यांनी दुःखी पीडित कामगार, असहाय्य सामान्य जनता यांच्या दुःखाचे चित्रण कसे केले याची माहिती दिली. तसेच लोकमान्य टिळक यांची राजकीय कारकीर्द, साहित्य तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचाही आढावा प्रा. चौगले यांनी घेत विद्यार्थ्यांनी प्रेमचंद, टिळक व साठे यांचे साहित्य वाचावे, असे आवाहन केले. यावेळी प्रा. सुमेधा नाईक, प्रा. एस. सी. बर्वे, प्रा. एम. आर. खोत, प्रा. हसन खान, संग्रामसिंह पवार यांनीही प्रेमचंद, टिळक, अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन ओंकार यादव याने केले तर आभार प्रा. एस. पी. खोबरे यांनी मानले.

You cannot copy content of this page