दांडेलीतील शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप

सरपंच व तंटामुक्त समिती अध्यक्षांचा उपक्रम : पेरणीचेही मार्गदर्शन

⚡बांदा ता.११-: नैसर्गिक आपत्तीचा सामना करत धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दांडेली सरपंच कृष्णा पालयेकर व तंटामुक्त समिती अध्यक्ष हेमंत कामत यांनी पुढाकार घेत मदतीचा हात म्हणून ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शेतकऱ्यांना मागणीनुसार भात बियाण्यांचे मोफत वाटप केले.
ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात सरपंच कृष्णा पालयेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष हेमंत कामत, उपसरपंच दिनेश माणगावकर, ग्रा.पं. सदस्य नीलेश आरोलकर, प्रफुल्लता माणगावकर, पोलिस पाटील अनंत मालवणकर, ग्रामसेवक वीणा धुरी व शेतकरी उपस्थित होते.

गतवर्षी अनुदान तत्त्वावर देण्यात आलेल्या बियाण्यांना शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना सर्व बियाणी मोफतच वाटप करण्याचा निर्णय सरपंच व अध्यक्षांनी घेतला. त्यानुसार गावातील 80 शेतकऱ्यांना मागणीनुसार कोमल, शुभांगी, ज्योती, जया, सोनम, रुपाली, सिद्धी, साईराज, सुवर्णा, प्रसन्न, कर्जत, अन्नपूर्णा, कावेरी, श्रीराम, ६४-४४, कावेरी, चिंटू अशा प्रकारच्या बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीचा उपक्रम कौतुकास्पद असून शेतकऱ्यांना एक मदतीचा हात दिला असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी दिल्या.

यावेळी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे ते चतुर्थ वर्षातील ओंकार कोकरे, संकेश वरुणकर अभिषेक हेंबाडे, प्रणव पोंक्षे, ज्ञानेश्वर भोई व वल्लभ दिवेकर आदी विद्यार्थ्यांनी, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना बीजप्रक्रिया विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन उपसरपंच दिनेश माणगावकर यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य नीलेश आरोलकर यांनी मानले.

You cannot copy content of this page