काँग्रेसच्या गुरुनाथ आईर, रुपेश आईर यांची मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी
सावंतवाडी ता.०७: सांगेली-घोलेवाडी येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या पुलाला आवश्यक तो निधी देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष गुरूनाथ आईर व तालुका सरचिटणीस रुपेश आईर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. याबाबतचे त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, घोलेवाडीची लोकसंख्या साधारणता ९०० ते १००० एवढी आहे. सदर वाडीवर इयत्ता चौथी पर्यंत प्राथमिक शाळा आहे. त्याखेरीज कोणतेही शासकीय किंवा निमशासकीय मुलभूत सोयी सुविधा संदर्भातील कार्यालय नाही. वाडीतून मुख्य गाव सांगेली अंतर सुमारे ५ किलोमीटर एवढे आहे, इयत्ता चौथी नंतर पुढील शिक्षणासाठी लहान मुलांना मुख्य गाव सांगेली येथे दररोज जाणे भाग आहे.
तसेच गावातील वयोवृद्ध रुग्ण यांच्यासाठी शासकीय औषध उपचाराची सोयदेखील मुख्य गाव सांगेली येथे किलोमीटरचे अंतर पार करून आल्यानंतर होऊ शकते. तलाठी कार्यालय, जिल्हा बँक शासकीय, धान्य दुकान प्राथमिक उपचार आदी सर्व मूलभूत सोयी सुविधांसाठी मुख्य गाव सांगेली येथे येणे भाग आहे. सदर वाडी हि दुर्गम भागात मोडत असुन मुख्य गाव सांगेली येथे येण्यासाठी एक्मेव सांगेली घोलेवाडी असा ५ किलोमीटरचा रस्ता धोकादायक अवस्थेत आहे. रस्त्यावर मध्यभागी एक नदी असून या नदीच्या वरच्या भागात पाटबंधारे विभागाचे लघु धरण आहे.
पावसाळ्यातील चार ते पाच महिन्यात नदी ओसांडून वाहत असते नदीवरील पूल हा अत्यंत सखलभागात असुन धोकादायक अवस्थेत आहे. पावसाळ्यातील जवळपास निम्मी अधिक दिवस या पुलावरून सतत पाणी वाहत असते. अशा स्थितीत गावातील लहान शाळकरी मुलं, औषध उपचारासाठी जाणारी रुग्ण, धान्य दुकान, तलाठी कार्यालय आदींसाठी ये-जा करणारे शेतकरी तसेच ग्रामस्थ यांचे जीवन धोक्यात येते. त्यामुळे या गावाला इतर जगापासून जोडणारा एकमेव पूल हा नव्याने मंजूर करून सर्वांचा प्रवास सुखकर करावा व नागरिकांचे मूलभूत सुविधांपासून होणारे हाल तसेच शाळकरी मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान, वेळोवेळी फुल वाहतुकीस बंद असल्यामुळे औषध उपचार वेळीच न होणारे रुग्ण या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्या विभागातर्फे त्वरित मंजुरी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
