पहिली ते आठवी विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तके उपलब्ध

सिंधुदुर्गनगरी ता ०६
समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी अनुदानित अशा एकूण १६०६ शाळांमधील १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी २ लाख ९६ हजार २८३ पाठ्यपुस्तक संचाचे मोफत वितरण करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.

जिल्हा परिषद समग्र शिक्षा अभियान विभागामार्फत मोफत पाठ्यपुस्तके या उपक्रमाअंतर्गत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा व खाजगी अनुदानित मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या एकूण १६०६ शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. यावर्षी प्रथमच पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी सुजन बालभारती संच याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच इयत्ता पहिली ते आठवीसाठी कुडाळ व वेंगुर्ला तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकात्मिक पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील ९ आदर्श शाळाना एकात्मिक पाठ्यपुस्तक संच यांचे वितरण करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी अनुदानित शाळांना वितरित करण्यात आलेल्या मोफत पाठ्यपुस्तक संचामध्ये सावंतवाडी तालुक्यातील २४४ शाळांना ५७ हजार १६०, मालवण २३२ शाळाना ३५ हजार २४०, कणकवली २४७ शाळाना ५२ हजार ४००, कुडाळ २६८ शाळाना ५२ हजार १३५, देवगड २४२ शाळाना ४५ हजार ६९६, वेंगुर्ला १५० शाळाना २२ हजार ४९५, वैभववाड़ी ११५ शाळाना १६ हजार ७९८, दोडामार्ग १०८ शाळाना १४ हजार ३६२ पाठ्यपुस्तक संचाचे असे एकुण जिल्ह्यातील १६०६ शाळामध्ये २ लाख ९६ हजार २८३ पाठ्यपुस्तक संच मोफत पुरविण्यात आले आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी या पुस्तकांचे पटसंख्ये नुसार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.

You cannot copy content of this page