मंदार केणी यांचा सवाल
मालवण ता.०४-:* आम. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून नगरविकास खात्याकडून प्रथमच भरघोस निधी थेटपणे मालवण नगरपालिकेला मिळाल्यानंतर मुख्याधिकारी संतोष जिरगे व शिवसेनेचे माजी नगरसेवक यांच्या सहकार्यातून शहरात ही कामे मार्गी लागत आहेत. नगरपालिकेच्या गेल्या पाच वर्षात पहिली दोन वर्षे जिल्ह्यात भाजपचे राज्यसभेचे दोन खासदार, राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडेच नगरविकास खाते असताना भाजपच्या नगरसेवकांनी नगरपालिकेसाठी किती निधी आणला याचा भाजपच्या विजय केनवडेकर यांनी खुलासा करावा, असे आव्हान शिवसेनेतर्फे माजी नगरसेवक मंदार केणी यांनी दिले आहे. भाजपचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्याप्रमाणे काम करत असल्याचा आरोप करत मुख्याधिकारी व शिवसेना माजी नगरसेवकांवर टीका केली होती.
त्यावर शिवसेनेतर्फे माजी नगरसेवक मंदार केणी यांनी शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेऊन केनवडेकर यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, भाई कासवकर व इतर उपस्थित होते. यावेळी मंदार केणी म्हणाले, कोरोना काळात विकास कामे ठप्प पडल्यावर आमदार वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून मालवण नगरपालिकेला निधी मिळाला.
शहर विकासाच्या दृष्टीने आम. वैभव नाईक यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मालवण नगरपालिकेला प्रथमच नगरविकास खात्याकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला. याच निधीचा योग्य प्रकारे खर्च करून आज शहरातील विविध विकासकामे होत आहेत. नगरसेवकांची मुदत संपली तरीही आम. नाईक व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या पाठपुरावामुळेच महिन्याच्या आत निविदा प्रक्रिया होऊन या कामांची पूर्तता होत आहे. लोकांना अभिप्रेत असलेली कामे झाली आहेत.
नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने काही माजी नगरसेवकांना या कामांत हस्तक्षेप करता आला नाही. कामे होऊ नयेत यासाठीही प्रयत्न केले गेले. शिवसेनेचे माजी नगरसेवक या कामांसाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र भाजपचे नगरसेवक सुशेगात आहेत. संतोष जिरगे हे प्रशासक असले तरी कोणी अभ्यासपूर्ण प्रश्न मांडले होते हे माहीत असल्यामुळेच ते माजी नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करत आहेत.
मुदत संपली तरी माजी नगरसेवक आपल्या प्रभागातील कामांसाठी पाठपुरावा करू शकतात. विरोधकांच्या प्रभागातील कामेही केली जात आहेत. कामे कोणामुळे होतात हे स्थानिक नागरिकांना माहीत असल्याने माजी नगरसेवकांबरोबरच नागरिकही या कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहत आहेत. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी कोणाच्या टिकेने घाबरून जाऊ नये, आपले काम सुरू ठेवावे, कोणी अडचणी आणल्यास शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असेही मंदार केणी म्हणाले.
