सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना १०० टक्के टोलमाफी मिळायलाच हवी

राष्ट्रवादीची मागणी;अन्यथा जनआक्रोश निर्माण होईल

कणकवली ता.०२-:* सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना १०० टक्के टोलमाफी मिळायलाच हवी . तसेच संपूर्ण महामार्गाचे काम होत नाही , तोपर्यंत कोणत्याही प्रकारे टोलवसूली करण्यात येऊ नये , अशी आमची मागणी आहे आमच्या मागणीचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करुन जिल्ह्याला टोलमाफी मिळवून द्यावी अन्यथा जनआक्रोश निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहिल . असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कणकवलीचे नगरसेवक अबिद नाईक यांच्यासह राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कणकवलीचे नगरसेवक अबिद नाईक त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य सावळाराम अणावकर, राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर ,उद्योग-व्यापार मालवण तालुका अध्यक्ष सूर्यकांत दाभोलकर, विलास गावकर, आकेरी सरपंच संदीप राणे ,कुडाळचे माजी उपसभापती आर.के. सावंत व राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ओसरगांव येथील टोलनाक्यावर टोल वसूलीच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत .

वास्तविक महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोलवसूली सुरु करणे चुकीचे आहे . तसेच या टोलवसूलीत सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना १०० टक्के टोलमाफी मिळण्याची गरज आहे . मुंबई – गोवा महामार्ग हा काही नव्याने झालेला महामार्ग नाही . मुळात ३० मिटर रुंद असलेल्या या महामार्गाचे केवळ रुंदीकरण करण्यात आले . रुंदीकरण करण्यात आलेल्या या महामार्गावर टोलवसूली करणे चुकीचे आहे . मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर हा अन्याय आहे .

दुसरीकडे महामार्गाची अनेक कामे अद्याप प्रलंबीत आहेत . ज्याठिकाणी टोलचे कार्यालय सुरु करण्यात आलेले आहे , त्याठिकाणीच्या जमिन मालकांना अद्याप मोबदला मिळालेला नाही . वागदे , नांदगाव येथेही मोबदला मिळणे बाकी आहे . तसेच याठिकाणी महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे . केवळ ६५ कि.मी. रस्त्याचे काम झाल्याचे दाखवत टोल सुरु करणे योग्य नाही . कणकवलीसह देवगड , वैभववाडी व मालवण तालुक्यातील नागरीकांना जिल्हा रुग्णालयापासून ते सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी ओसरगांव येथूनच जावे लागते . अशा स्थितीत त्यांना टोल भरावा लागणे हा जिल्हावासीयांवर अन्यायकारक आहे असे यावेळी निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page