आंबा व्यवसायिक बागायतदार यांची आमदार दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
मालवण ता.०१-:* आंबा बागायतदारांच्या उन्नतीसाठी आंबा बागायतदार- व्यापारी संघास सिंधुरत्न योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघाने सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आम. दीपक केसरकर यांच्याकडे निवेदन सादर करून केली आहे.
मालवण दौऱ्यावर आलेल्या आम. दीपक केसरकर यांची आंबा व्यावसायिक संघांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी अध्यक्ष, संजय नरे, पपु लुडबे, राजन लुडबे, प्रसाद आडवणकर, गणेश सातार्डेकर यांच्यांसह शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके,बाबी जोगी, स्वप्निल आचरेकर आदी उपस्थित होते. सिंधू रत्न योजने अंतर्गत आंबा बागातदार, व्यापारी यांना समाविष्ट करून घेतल्यास या व्यापाऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, आर्थिक उन्नती होईल. याआधी चांदा ते बांदा योजनेचा आंबा बागायतदारांना लाभ घेता आला नव्हता.
सिंधुरत्न योजनेत आंबा बागायतदार यांना समाविष्ट करून त्यांना लागणारी अवजारे हि ७५ टक्के अनुदातून देण्यात यावी. यामध्ये पॉवर स्प्रे, सिंस्टेक टाकी, ग्रास कटर, क्रेट (१०० नग), पॉवर टिलर, ताडपत्री, आंबा पल्प मशिन, बॅरल्स, मालवाहतूक गाडी या गोष्टींचा समावेश करावा, अशी मागणी आंबा व्यावसायिक संघाने केली आहे. याबाबत आम. दीपक केसरकर यांनी पुढील दौऱ्यात आंबा बागायतदार, व्यावसायीक,कृषी विद्यापीठ आणि कृषी खाते यांची संयुक्त बैठक आयोजित करून या बैठकीत सर्व संकल्पना स्पष्ट करून धोरण निश्चित करणार असे सांगितले.
