सरपंच संघटना 30 मे रोजी विज वितरण कार्यालयात धडक देणार
कणकवली ता.२९-:* कणकवली तालुका तसेच जिल्ह्यातील बहुतांश गावातील ग्रामिण भाग स्ट्रीट लाईट अभावी अंधारात असल्याचे दिसून येत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर कणकवली तालुका सरपंच संघटना सोमवार 30 मे रोजी सकाळी 10.30 वा विज वितरण कंपनी कणकवली येथे कार्यालयात धडक देणार असल्याचे सरपंच संघटने कडून सांगण्यात येत आहे. कोरोना काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश गावातील ग्रामिण भागातील स्ट्रीट लाईट चे विज बिल भरले नसून दोन वर्षांत जवळपास एका गावचे सरासरी 10 लाख रुपये च्या आसपास थकीत विजबिल झाले असल्याने विजवितरण कंपनी ने प्रत्येक गावातील स्ट्रीट लाईट चे विद्युत पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली असल्याने ऐन मे महिन्यात ग्रामीण भागातील नागरिक व मुंबई कर चाकरमान्यांना अंधारात चाचपडत फिरण्याची वेळ आली आहे. अख्खा कणकवली तालुका स्ट्रीट लाईट अभावी अंधारात असल्याचे दिसून येत आहे.
मध्यंतरी शासनाने प्रत्येक गावातील स्ट्रीट लाईट विज बिल हे ग्रामपंचायतीच्या 14 व 15 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून भरण्यासाठी आदेश दिले होते. मात्र संबंधित निधी मंजूर आराखडे तयार करण्यात आलेल्या नुसार आहेत. तेव्हा गावची विकास कामे पूर्ण करावीत की, लाईट बिले भरावीत विज बिल न भरण्यासाठी प्रत्येक गावातील सरपंच व सरपंच संघटनेने विरोध केला होता. याबाबत वारंवार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी,विज वितरण कंपनीचे अधिकारी यांना सरपंच संघटनेने पत्रव्यवहार केला आहे .
