ट्राफिक कंट्रोलिंगसाठी डीवायएसपीसह, पोलीस निरीक्षक उतरले
कणकवली ता.२८-:* कणकवली शहरातील पटवर्धन चौकात असलेली वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी डीवायएसपी विनोद कांबळे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले पोलीस पथकासह सकाळी मैदानात उतरले. सकाळच्या सत्रात 15 वाहनांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली.
कणकवली शहरातील पटवर्धन चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. त्यातच खरेदी अथवा अन्य कामासाठी आलेले वाहनधारक आपली वाहने पटवर्धन चौकात ब्रिजखाली पार्क करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी ही नेहमीचीच ठरलेली. आज सकाळी स्वतः एसडीपीओ कांबळे, पी. आय. राजेंद्र हुलावळे यांनी पोलीस कर्कचाऱ्यांसह पटवर्धन चौकात अचानक धडक देत अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
यावेळी बोलताना पीआय हुलावळे यांनी सांगितले, की अनधिकृत पार्किंग केल्यास कोर्टाची पायरी चढावी लागेल. तसेच मोटर वाहतूक नियमानुसार पहिल्या वेळेस किमान 500 रु. दंड व तेच वाहन पुन्हा अनधिकृत पार्किंग केलेले आढळल्यास दीड हजार दंड होऊ शकतो. सकाळी करण्यात आलेल्या कारवाईवेळी पोलीस उपनिरीक्षक मुंडे, ए. एस. आय. विनायक चव्हाण, वाहतूक पोलीस हवालदार चंद्रकांत माने, हवालदार बाईत, हवालदार चंद्रकांत झोरे, वाहतूक पोलीस नाईक विजय कलकुटकी, सुनील निकम, महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी कुंभार आदी सहभागी झाले होते.
