मालवण दि प्रतिनिधी घुमडे येथून दुचारी चोरून नेणाऱ्या चोरट्याला मालवण पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून चोरलेली मोटारसायकलही जप्त केली आहे. संशयित आरोपी सोनू उर्फ करण रामू (२२, मूळ रा. दौलतापूर तहसील लिहासन जि. लखिमपूर खिरी, राज्य उत्तर प्रदेश) याला मालवण न्यायालयासमोर हजर केले दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण यांनी काम पाहिले: मालवण पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत दुचाकी चोरट्याला पकडल्याबद्दल पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे.
१९ जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास प्रथमेश संतोष सावंत यांचे वडील संतोष सावंत यांची दुचाकी यामाहा (एफझेड एचएच ०७. एएल १३२७) घेऊन त्यांच्या मूळ घरी घुमडे येथे गेले होते. बागेत रखवालीकरिता ठेवलेल्या सोनू उर्फ करण रामूने ही दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी मालवण पोलिसात प्रथमेश संतोष सावंत (२२, रा. रामेश्वर कॉम्प्लेक्स, भरड मालवण) यांनी दुचाकी चोरीची तक्रार दिल्यानंतर भादंवी कलम ३७९ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात आरोपी मुंबई येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून मालवण पोलिसांनी मुंबई येथे जाऊन आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या मदतीने सोनू उर्फ करण रामूने चोरून नेलेली दुचाकी त्याच्या ताब्यातून जप्न करत त्याला रविवारी अटक केली. तपास पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एच. व्ही. पेडणेकर व त्यांच्या टिमने केला.
