काजू पिकावरील कीड व रोगाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन

*⚡वेंगुर्ला ता.२०-:* वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील शेतक-यांच्या काजू बागांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. काजू पिकावरील कीड व रोग या संदर्भात शेतक-यांना उद्भवणा-या समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील किटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा शास्त्रज्ञ व हॉर्टसॅप प्रकल्प समन्वयक डॉ. विजयकुमार देसाई, वरिष्ठ संशोधन सहाय्यक प्रमोद तल्हा, संशोधन सहयोगी डॉ. गोपाळ गोळवणकर यांच्यासमवेत महाराष्ट्र शासनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांनी वेंगुर्ला सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील काजू पिकावरील कीड व रोग या संदर्भात शेतर्कयांना उद्भवणा-या समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शेतक-यांच्या काजू बागांना भेटी दिल्या. निवडलेल्या गावातील काजूच्या बागांच्या पाहणी दरम्यान असे निदर्शनास आले की, बहुतांशी बागांमध्ये प्रामुख्याने काजूमध्ये टी मॉस्किटो बग (ढेकण्या), खोड व मुळ पोखरणारा किडा (रोठा) व अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पानांवर पडणारे विविध रंगाचे ठिफ यांचा प्रादुर्भाव आढळून आला. याबाबत उपाययोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतक-यांना काजू पिक संरक्षणासाठी लघु मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील पाल, अणसुर,जोसोली, आडेली व भेंडमळा, सावंतवाडी तालुक्यातील बांदा, वाफोली, भालावल व असनिये तसेच दोडामार्ग तालुक्यातील कसई दोडामार्ग, वझरे, गिरोदे व आंबेली या गावांमधील कृषी विभागाचे प्रक्षेत्र अधिकारी उपस्थित होते. वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, कृषी सहाय्यक श्रद्धा वाडेकर, कृषी सहाय्यक देऊलकर, कृषी पर्यवेक्षक घोंगे व नाईक, सावंतवाडी मंडल कृषी अधिकारी विजयकुमार वाघमारे, मंडल कृषी अधिकारी प्रकाश घाडगे, कृषी सहाय्यक अतुल माळी, कृषी सहाय्यक रसिका राणे, दोडामार्ग कृषी सहाय्यक जी.आर.लोखंडे, शेखअझमुद्दिन सरगुरू, ए.एस.कोळी, एन.एस.चौधरी, एच.एस.मोरे व जी.आर.वाघमारे आदी उपस्थित होते. ही मोहीम वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.बळवंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.

You cannot copy content of this page