बॅ नाथ पै यांची ५१ वी पुण्यतिथी दाणोली येथे साजरी

समर्थ साटम महाराज वाचनालयात अध्यक्ष गावडेंच्या हस्ते पैं च्या प्रतिमेचे पूजन

सावंतवाडी ता.२०-: दाणोली येथील समर्थ साटम महाराज वाचनालय येथे बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५१ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे यांच्या हस्ते नाथ पै यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी वाचनालयाचे सचिव डॉ.डी.एल.सावंत, गिरीधर चव्हाण, दिलीप सुकी उपस्थित होते. बॅरिस्टर नाथ पै यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देताना भरत गावडे म्हणाले की, बॅरिस्टर नाथ पै यांनी आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने देशवासीयांची मने जिंकली. संसदेत ते बोलत असताना विरोधक देखील त्यांच्या वक्तृत्वाचा आनंद घेत असायचे. बॅरिस्टर नाथ पै यांना अनाथांचा नाथ, दिनांचा कैवारी, प्रकाशाचा पुत्र, लोकशाहीचे कैवारी अशी बिरुदे लोकांनी दिली.

आपल्या कोकणाच्या मातीतले एक अष्टपैलू हिरे म्हणून बॅरिस्टर नाथ पै यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप संपूर्ण देशपातळीवर उमटवली आहे. सीमा भागातील मराठी बांधवांवर होणारा अन्याय बॅरिस्टर नाथ पै हे कधीच सहन करू शकत नव्हते. अशा अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची स्मृति जागवणे सर्वांचेच कर्तव्य आहे. वाचनालयात त्यांच्या चरित्र ग्रंथांची उपलब्धता केली असून वाचकांनी त्यांचे चरित्र अभ्यासावे, असे आवाहन भरत गावडे यांनी उपस्थितांना केले. यावेळी उपस्थित असलेले डॉ.डी.एल.सावंत, गिरीधर चव्हाण, दिलीप सुकी यांनीही मनोगते व्यक्त करून बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मृतींना अभिवादन केले. ग्रंथपाल दीपा सुकी यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page