दोडामार्ग, वैभववाडी विजय उभारी देणारा;देवगडचा प्रभाव आ नितेश राणेंच्या जिव्हारी लागणारा
*⚡सिंधुदुर्ग ता.१९ प्रसन्न गोंदावळे-:* आपल्या ‘डॅशिंग’ आणि बेधडक कार्यपद्धतीने युवा वर्गासाठी ‘आयकॉन’ ठरलेले आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळविली आहे. तर दुसरीकडे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या देवगड नगरपंचायतीवरील सत्ता गमविल्याने हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. एकूणच आमदार राणे आणि भाजपसाठी ही निवडणूक ‘थोडी ख़ुशी थोडा गम’ अशीच ठरली आहे.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या ज़िल्हा बँक निवडणुकीत भाजपने निर्विवाद विजय मिळवून ज़िल्हा बँक आपल्या ताब्यात घेतली. या विजयात आमदार नितेश राणे यांचा सिंहाचा वाटा होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. विशेष म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही आमदार राणे यांनी हे यश मिळवून आपल्या कुशल नेतृत्वाची झलक दाखविली होती. या विजयानंतर ज़िल्ह्यातील सर्व नगरपंचायतीही भाजपमय करू, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्याप्रमाणे मोर्चेबांधणी करून आपले निवडक योद्धे आखाड्यात उतरविले होते.
तर ज़िल्हा बँक निवडणुकीतील निसटत्या पराभवाने बरेच काही शिकलेल्या विरोधकांनीही सर्व ताकद पणाला लावल्याने निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज सकाळी झालेल्या मतमोजणीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट झाले. यामध्ये चारपैकी दोडामार्ग आणि वैभववाडी या दोन नगरपंचायतीवर भाजपने निर्विवाद विजय मिळविला आहे. कुडाळ नगरपंचायतीचा ‘अंतिम’ निर्णय अजून झालेला नाही.
मात्र, देवगडमध्ये शिवसेना ८. भाजप ८ असे समसमान बलाबल झाले असले तरी राष्ट्रवादीने एक जागा जिंकल्याने देवगड नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आली असून, भाजपने आपला बालेकिल्ला गमावला आहे. दोन नगरपंचायतीमधील विजयापेक्षा हा पराभव आमदार नितेश राणे यांच्यासाठी नक्कीच वेदनादायी ठरला आहे. मात्र, या अपयशाने खचून न जाता आपल्या सडेतोड आणि बेधडक अंदाजाने आगामी निवडणुकांमध्ये ते नव्या जोमाने काम करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
