बांदा व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला विरोध
*⚡बांदा ता.१९-:* बांदा बाजारपेठेत आज बेकायदा विक्रीसाठी आणण्यात आलेल्या परप्रांतीय सोफासेट विक्रेत्यांना बांदा व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करत हुसकावून लावले. या विक्रेत्यांकडे कोणताही विक्री कर भरल्याची किंवा ग्राहकांना विक्री करताना अधिकृत बिल नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे सदस्य अभय सातार्डेकर यांनी दिली. व्यापारी संघाने दणका दिल्यानंतर या विक्रेत्यांनी तात्काळ येथून काढता पाय घेतला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी शहरातील कट्टा कॉर्नर येथे काही परप्रांतीय व्यापारी सोफासेट ची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती व्यापारी संघाला मिळाली. कमी किमतीत कोणतेही अधिकृत बिल न देता व शासनाचा तसेच व्यापारी महासंघाचा महसूल बुडवून ही विक्री सुरू होती. व्यापारी संघाचे अभय सातार्डेकर यांच्यासह शहरातील व्यापारी सुदन केसरकर, प्रवीण शिरसाट, सुधीर शिरसाट यांनी याठिकाणी येत या विक्रेत्यांना कडक शब्दात समज दिली. तसेच तात्काळ येथून न गेल्यास माल जप्त करून कारवाई करण्याचा इशारा दिला. यावेळी व्यापारी संघाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. व्यापारी संघाच्या आक्रमक भूमिकेमुळे या परप्रांतीय विक्रेत्यांनी येथून काढता पाय घेतला.
