वेंगुर्ला रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी रुजू होणार

*⚡वेंगुर्ला ता.१९-:* वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात शिरोडा येथील औषधनिर्माण अधिकारी आठवड्यातील दोन दिवस येणार तर तालुक्यातील शाळा तपासणी औषध निर्माण अधिकारी रुग्णालयात शाळा नियमित सुरु होईपर्यंत कार्यरत राहणार आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कळविले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिकांनी १७ जानेवारीपासून बाह्यरुग्ण तपासणी बंद न ठेवता ती सुरु ठेवली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. अतुल मुळे यांनी दिली.

ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला येथे औषधनिर्माण अधिकारी हे पद रिक्त असल्याने अधिपरिचारिकांजवळ औषध निर्माण अधिकारी यांचा कार्यभार दिला जातो. परंतु, ते काम करणे शक्य नसल्याने अधिपरिचारिकांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. औषध निर्माण अधिकारी दिनेश राणे यांची प्रशासकीय बदली झाली आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत कार्यमुक्त केले नाही. तरी त्यांना त्यांच्या पदावर तात्काळ रुजू करावे, यासाठी अधिपरिचारिकांनी आरोग्य संचालकांना व जिल्हा शल्यचिकित्सक यांना लेखी स्वरुपात दिले होते.

You cannot copy content of this page