अन्यथा २६ जानेवारीला उपोषण छेडण्याचे दिगंबर साटेलकर यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
*⚡सावंतवाडी ता.१८-:* मोबाईल कंपनीची केबल टाकण्यासाठी शहरात करण्यात आलेली रस्ता खोदाई पालिका प्रशासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीचा भंग करून करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले असून चुकीच्या पद्धतीने केलेले काम पुन्हा करण्यात यावे तसेच जबाबदारी झटकलेल्या पालिकेचे मुख्याधिकारी व बांधकाम अधिकार्यांवर कारवाई करा अन्यथा हा २६ जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिगंबर साटेलकर यांनी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांना दिला आहे.
मोबाईल कंपनीने शहरात रस्ता खोदाई करून टाकलेली केबल कामाची माहिती श्री साटेलकर यांनी माहितीच्या अधिकारात मागितली असता पालिकेने घालून दिलेल्या एकूण पंधरा अटी व नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात त्यांनी पालिकेवर प्रशासक म्हणून नियुक्त असलेल्या प्रांताधिकारी श्री पानवेकर यांचे लक्ष वेधले असून त्यांना दिलेल्या निवेदनाची प्रत प्रसिद्धीस दिली आहे. श्री साटेलकर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये संबंधित कंपनीला शहरात केबल टाकण्यासाठी रस्ता खोदायला पालिका प्रशासनाने एकूण पंधरा अटी व नियम घालून परवानगी दिली होती परंतु प्रत्यक्षात काम करताना संबंधित कंपनीकडून अटी व नियमांचा भंग करण्यात आला आहे त्यामुळे याचा फटका शहरातील नागरिक,वाहन चालक यांना बसला. पालिका प्रशासनाने घालून दिलेल्या अटीचे पालन करण्यात येत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी मुख्याधिकारी तसेच बांधकाम चे अधिकारी यांची असल्याने त्यांनीही याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामात कसूर केलेला आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याबरोबरच अटी व शर्ती प्रमाणे सदर खोदाई केलेले काम पुन्हा करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. आपल्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या 26 जानेवारी रोजी नगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांनी सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तसेच पोलिस निरीक्षक सावंतवाडी यांनाही पाठवली आहे.
