वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात १२ जानेवारी रोजी दुर्लक्षित वनस्पती कलम बांधणी व रोपवाटीका व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण घेण्यात आले. यात २४ नर्सरीधारकांनी लाभ घेतला.
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ दापोली आणि लुपिन फाऊंडेशन सिधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे सुरंगी, त्रिफळ, वटसोल, वावडिग, कडीकोकम आणि स्थानिक जांभूळ या पिकांचे सर्वेक्षण, उत्कृष्ठ वाण ओळख, अभिवृद्धी आणि कलम / रोपे निर्मिती याविषयी गेली तीन वर्षे संशोधन करण्यात आले आहे. या पिकांची लागवड आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊन शेतक-यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडावी या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये या पिकांना असलेला वाव, त्यांची उत्पादन क्षमता, कलम बांधणीच्या विविध पद्धती आदींविषयी बौद्धिक तसेच प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.व्ही.एस.देसाई, डॉ.एम.पी.सणस, डॉ.एन.व्ही.गावडे तसेच लुपिन फाऊंडेशनचे सहकारी प्रताप चव्हाण यांनी प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
रमेश वरक, जगदीश भुवड व ललित दळवी यांनी प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक दाखविले. हे प्रशिक्षण खूपच मार्गदर्शक ठरले असून विद्यापिठाच्या मानसाप्रमाणे आम्ही सुद्धा या पिकांच्या लागवडीसाठी आणि प्रसारासाठी कार्यरत राहू असा विश्वास प्रशिक्षणार्थींनी दिला.
