गुरुदास गवंडे यांच्याकडून शासन निर्णयाचे स्वागत
*⚡सावंतवाडी ता.१३-: दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आग्रही होते. यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने करून दुकानांच्या पाट्या फोडल्या. अखेर उशिराने का होईना, महाराष्ट्र सरकारने २०१७ च्या अधिनियमात बदल करून दुकानांच्या पाट्या मराठी असण्याबाबत निर्देश लागू केले आहेत. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत असून अखेर मनसेचा विजय झाला आहे, असे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मनसेच्या दणक्यानंतर अनेक दुकानदारांनी पाट्या मराठीत केल्या. पण नोकरी व सेवाशर्ती अधिनियम २०१७ चा फायदा घेऊन दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकानदार या नियमातून पळवाट काढत होते. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक तक्रारी शासन दरबारी केल्या होत्या. त्याचाच विजय झाला असून सरकारने अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा केल्यामुळे मोठ्याप्रमाणेच छोट्या दुकानांवरील पाट्याही आता मराठीतच कराव्या लागणार आहेत. बहुसंख्य दुकानदारांना आता मराठी देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत. तेव्हा उशिरा का होईना, सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मनसेतर्फे स्वागत आहे, असे मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे
