मालवण दि प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे अकाली निधन झाल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मंगळवारी चव्हाण यांच्या मालवण आडवण येथील मूळ निवासस्थानी भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले. चव्हाण यांच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसलेल्या चव्हाण कुटुंबियांना ना. राणे यांनी धीर दिला.
मूळ मालवण आडवण येथील रहिवासी आणि कुडाळ येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सुधीर चव्हाण हे कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत भाजप पक्षाकडून उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते. मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या चव्हाण यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. आज सायंकाळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मालवणात दाखल होत आडवण येथील चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी राणे यांनी चव्हाण कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, नगरसेविका पूजा करलकर, प्रमोद करलकर, मंदार लुडबे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, राजू बिडये, अभय कदम, भाई मांजरेकर आदी व इतर उपस्थित होते.
