मालवण दि प्रतिनिधी सध्या गाजत असलेल्या आणि राणे कुटुंबियांसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या बनविलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीचे मतदान मालवणात शांततेत सुरू असून दुपारपर्यंत या बँकेच्या ११० मतदारांपैकी ९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मालवण तहसील कार्यालयात पार पडत असलेल्या या निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.
या निवडणुकीत मालवणचे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक व्हिक्टर डॉन्टस, लक्ष्मण उर्फ बाबा आंगणे, सुरेश चौकेकर, मेघनाद धुरी, संदीप उर्फ बाबा परब यांचे भवितव्य आज जिल्हा बँकेचे मतदार मतपेटीत बंद करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर तसेच राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. १९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सकाळी जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक व्हिक्टर डॉन्टस यांच्यासह, कामालकांत उर्फ बाळू कुबल, सुरेश चौकेकर, संदीप परब यांनी मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीत मालवण तालुक्यातील रहिवासी असणारे पाचजण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यात मजूर संस्था गटातून लक्ष्मण उर्फ बाबा आंगणे, (महाविकास आघाडी), अनुसूचित जाती जमाती गटातून सुरेश चौकेकर (भाजप), विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग- मेघनाद धुरी (महाविकास आघाडी), सहकारी शेती पत पुरवठा विविध कार्यकारी शेती संस्था गटातून कमलाकांत उर्फ बाळू कुबल (भाजप), व्हिक्टर डॉन्टस (महाविकास आघाडी) तर विणकर संस्था, घरबांधणी संस्था गटातून संदीप उर्फ बाबा परब (भाजप) असे सहाजण निवडणूक रिंगणात उतरले आहे. महाविकास आघाडीने मालवण तालुक्यातील तीन उमेदवार दिले असून या निवडणुकी साठी भाजपने तीन उमेदवार दिले आहेत. महाविकास आघाडीतर्फे बाबा आंगणे (शिवसेना), व्हिक्टर डॉन्टस (राष्ट्रवादी), मेघनाद धुरी (काँग्रेस) तर भाजप तर्फे संदीप परब, कमलाकांत कुबल, सुरेश चौकेकर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवणुकीसाठी ११० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार श्री. पाटील यांनी मालवणचे केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदान केंद्रावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, दीपक पाटकर, महेश मांजरेकर, कृष्णानाथ तांडेल, शिवसेनेचे नितीन वाळके, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, बबन शिंदे, पूनम चव्हाण, गणेश कुडाळकर, मंदार ओरसकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, काँग्रेसचे साईनाथ चव्हाण, श्रीकृष्ण तळवडेकर, अरविंद मोंडकर आदी व इतर उपस्थित होते.
