जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे आयोजन;विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद
सिंधुदुर्गनगरी ता २८-: भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन जिल्ह्याचे भावी चित्रकार बना. यासाठी नियमित सराव आणि चांगले मार्गदर्शन घ्या. असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आयोजित चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली.
या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत ५ वीं ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार घालून व दीपक प्रज्वलनाने करण्यात आले. या वेळी शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, जिल्हा परिषद सदस्य शेता कोरगावकर, माजी जिप उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा देताना उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्र कार निर्माण व्हावेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन नियमित सराव आणि चांगले मार्गदर्शन घ्यावे. स्वतःबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल करावे. असे प्रतिपादन केले.
तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे तीन गटात नियोजन केले आहे. पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व अकरावी-बारावी अशा तीन गटात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील प्रत्येक गटात व प्रत्येक स्पर्धा प्रकारात २४ विद्यार्थी अशाप्रकारे ७२ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. २८ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा होणार असून शिक्षण विभागाने या स्पर्धांचे नियोजन केले आहे. तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यात आले असल्याची माहिती या वेळी शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी दिली.
