दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून
ओरोस-:जय मल्हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या पाठपुराव्याने मंजूर झालेले बावशी गावातील रेशनिंग दुकान बचत गटाला न देता एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला देण्याचा घाट पुरवठा विभागाने घातला असून या विरोधात आणि आपल्याला रेशनिंग दुकान परवाना मिळावा यासाठी जय मल्हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान या उपोषण कर्त्या महिलांशी जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांनी चर्चा केली मात्र चर्चेत तोडगा न निघाल्याने हे उपोषण आम्ही सुरूच ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यां महिलांनी सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जल मल्हार स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी बचत गटाच्या प्रमुख स्नेहलता सुषमा सावंत, यांच्यासह अन्य महिलांनी उपोषण सुरू केले आहे. बावशी येथील जय मल्हार स्वयं सहायता महीला बचत गटामार्फत बावशी गावाला स्वतंत्र रेशनिंग दुकान मिळावे, यासाठी गेल्या वर्षी पुरवठा विभागाकडे प्रस्ताव सुपूर्द केला होता. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी डांबरीकरण केलेला रस्ता नाही.
तसेच इतर भागातील लोकांना दूर जावं लागणार म्हणून पुरवठा विभागाने दुसरी जागा दाखविण्यात सांगितले होते. परंतु या दोन ते तीन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. तसेच बचत गटाच्या महिलाही कोरोना बाधीत होत्या. यामुळे आम्ही या काळात कुठे जावू शकलो नाही आणि याच कालावधीत पुरवठा विभागाने आमचा रेशनिंग दुकान परवाना रद्द केला आहे. मात्र बावशी गावाला मंजूर झालेले रेशन दुकान एका पक्षाच्या कार्यकर्त्याला देण्याचा घाट पुरवठा विभागाने घातला आहे. असे करून प्रशासन महिला बचत गटाच्या महिलांचा रोजगार काढून घेत आहे. त्यामुळे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात जय मल्हार स्वयंसहाय्यता महिला बचतगटाने प्रयत्नच्या महिला पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
