वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला शहरातील वॉर्ड नं.१७ मधील आनंदवाडी ते पॉवर हाऊस समोरील गटाराचे काम सन २०१९-२०च्या दरम्यान करण्यात आले. त्यावेळी त्या गटारांची खोली व रुंदी वाढविण्यात आली. परंतु, सदरचे काम अर्धवट अवस्थेत आहे. गटाराची खोली वाढलेली असल्याने व त्यावर झाकण नसल्याने याठिकाणचे गटार हे धोकादायक असून त्यामध्ये पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे नगरपरिषदेचा पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी केला आहे.
अॅड.सातार्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या रस्त्यावरुन पादचारी तसेच शाळकरी मुले देखील जात असल्याने त्यांच्यासाठीही हे गटार धोकादायक आहेत. असे असताना देखील नगरपरिषद याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. हे उघडे गटार त्वरित बंद करावेत, अन्यथा त्यात पडून कोणाचा अपघात झाल्यास त्यास केवळ नगरपरिषद व त्याचे संबंधित अधिकारी हेच जबाबदार असतील, असा इशाराही दिला आहे. फोटोओळी – आनंदवाडी ते पॉवर हाऊस येथील उघड्या अवस्थेतील धोकादायक गटार.
