मालवण (प्रतिनिधी) मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिरात आणि श्री देवी भवानी मंदिरात नवरात्रोत्सव व दसरोत्सव उत्साहात साजरा झाला.यानिमित्त घटस्थापना करून नऊ दिवस देवीची आरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याने किल्ल्यावरील नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. तर काल दसऱ्यानिमित्त सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. अष्टमी दिवशी सकाळी श्री शिवराजेश्वर मंदिरात होम हवन करण्यात आले तसेच रात्री शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा पार पडला. त्यानंतर ह.भ प. अक्षय परुळेकर आणि आनंद परब यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. बाळकृष्ण गोंधळी यांच्याकडून देवीचा जागर गोंधळ पार पडला. १५ ऑक्टोबर रोजी शिवाजी महाराजांची पालखी सीमोल्लंघनासाठी मंदिरातून बाहेर पडली. छ. शिवाजी महाराजांनी पालखीतून प्रथम श्री महापुरुष मंदिर आणि श्री महादेव मंदिर येथे भेट देऊन पालखी भवानी मातेच्या मंदिराकडे प्रस्थान केले. भवानी मातेचे दर्शन घेऊन पालखी माघारी येताना साखर विहिरी जवळ सोनं लुटीचा कार्यक्रम पार पडला. श्री शिवराजेश्वर मंदिराचे पुजारी सयाजी सकपाळ यांनी आपट्याच्या पानांची विधिवत पूजा केली नंतर छ. शिवरायांच्या तलवारीने आपट्याच्या पानांना स्पर्श करताच समस्त किल्ला रहिवाशांनी सोनं लुटीचा आनंद घेतला.
शिवराजेश्वर आणि भवानी मंदिरात नवरात्रोत्सव व दसरोत्सव उत्साहात संपन्न
