*💫देवगड दि.११-:* जामसंडे आझादनगर येथील महेश जनार्दन शिर्के(४०) या युवकाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी १० वा.सुमारास जामसंडे गावठण येथील वडाजवळ आढळला.अति मद्यप्राशानाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार महेश शिर्के हे शुक्रवारी सकाळी १० वा.सुमारास जामसंडे गावठण येथील वडाजवळ मृतावस्थेत दिसला. याबाबत ग्रामस्थांनी आझादनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष सुभाष धुरी यांना कळविले. त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावून पाहणी केली यावेळी त्याचा मृत्यु झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी देवगड पोलिस स्थानकात खबर दिली.
त्यानंतर महेश शिर्के याचा मृतदेह देवगड ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला.डॉक्टरांनी पाहणी करून मृत्यु झाल्याचे घोषित केले.त्याचा मृत्युचे नेमके कारण समजु शकले नाही. मात्र अति मद्य सेवनाने मृत्यु झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
शिर्के हा मोलमजुरी व मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवित होता.त्याचा पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.देवगड पोलिस स्थानकात याबाबत खबर देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद केली आहे.तपास पो.हे.कॉ.शैलेश कांबळे करीत आहेत.
